Jump to content

माधवराव पेशवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थोरले माधवराव पेशवे
छत्रपतींचे पेशवा
माधवराव पेशवे
अधिकारकाळ जुलै २०, १७६१ - नोव्हेंबर १८, १७७२
राजधानी पुणे
पूर्ण नाव माधवराव बाळाजी भट (पेशवे)
पदव्या छत्रपतींचे सेवक
जन्म फेब्रुवारी १६, १७४५
मृत्यू नोव्हेंबर १८, १७७२
थेऊर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी नानासाहेब पेशवे
छत्रपती रामराजे छत्रपती
उत्तराधिकारी नारायणराव पेशवे
वडील नानासाहेब पेशवे
आई गोपिकाबाई
पत्नी रमाबाई
राजघराणे पेशवा
राजब्रीदवाक्य हर हर महादेव

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (जन्म : १६ फेब्रुवारी १७४५; - १८ नोव्हेंबर १७७२), हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते.

बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळे माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचे वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव व त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम व मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो. नाना फडणीस रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा माधवरावांनी केली. तोफा व दारुगोळा बनविण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले त्याचप्रमाणे नाणी पाडण्यासाठी टांकसाळी यांची व्यवस्था केली एकूणच त्यांची कारकीर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली [१]

शत्रूचा उठाव[संपादन]

पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा, परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.

निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रुपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.

या नंतर इ.स. १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली.

इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आहे असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरूपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.

दिल्लीकडील राजकारण[संपादन]

पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुऊन कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.

मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथेंमराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.[२]

या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले.

त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी[संपादन]

इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते. दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्‍या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात.

माधवरावांचा मृत्यू[संपादन]

इ.स. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन पुण्याजवळच्या थेऊर येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.[३]

माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील पुस्तके[संपादन]

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ Kshirsagar, Sanjay. "पेशवेकालीन इतिहास: थो. माधवराव पेशवा". पेशवेकालीन इतिहास. 2019-12-21 रोजी पाहिले.
  2. ^ "WikiZero - माधवराव पेशवा". www.wikizero.com. 2019-12-21 रोजी पाहिले.
  3. ^ "माधवराव पेशवे - Wikiwand". www.wikiwand.com. 2019-12-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]