Jump to content

मायकेल मधुसूदन दत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मायकेल मधुसूदन दत्त
जन्म २५ जानेवारी १८२४
सागरदरी, जेसोर जिल्हा , बंगाल प्रांत , ब्रिटिशकालीन भारत (आता बांगलादेश)
मृत्यू २९ जून १८७३
कोलकाता, बंगाल प्रांत, ब्रिटिशकालीन भारत
चिरविश्रांतिस्थान लोअर सर्क्युलर रोड सेमेटरी
नागरिकत्व ब्रिटिशकालीन भारतीय
जोडीदार रिबेका थॉम्पसन मॅकटॅव्हिश (१८४८ ते १८७३)
अपत्ये ३ - मॅकटॅव्हिश दत्त हेन्रीएट्टा एलिझाबेथ शर्मिष्ठा (१८५९ ते १५ फेब्रु.१८७९), फ्रेडरिक मायकेल मिल्टन (२३ जुलै १८६१ ते ११ जून १८७५), अल्बर्ट नेपोलियन (१८६९ ते २२ ऑगस्ट १९०९)
वडील राजनारायण दत्त,
आई जान्हवी देवी


मायकेल मधुसूदन दत्त हे एकोणिसाव्या शतकातील बंगाली भाषेतील महत्त्वाचे कवी आणि आधुनिक बंगाली नाट्यलेखनाचे प्रणेते म्हणून ओळखले

जातात.[१].

ब्रिटिश राजसत्तेची मुहूर्तमेढ भारतात बंगाल प्रांतात रोवली गेली. साहजिकच बंगालमधील अनेक विचारवंत ब्रिटिश आधुनिक शिक्षणपद्धती आणि विचारसरणीने प्रभावित झाले. बंगालमध्ये अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ या आधुनिक शिक्षणाने प्रेरित होऊन नवनिर्माण करू लागले. मायकेल मधुसूदन दत्त हे यांतीलच एक प्रमुख साहित्यकार होत.

जन्म ,बालपण आणि शिक्षण[संपादन]

२५ जानेवारी १८२४मध्ये पूर्व बंगालच्या जेसोर जिल्ह्यातील सागरदरी हा गावात मायकेल मधुसूदन दत्त यांचा जन्म झाला. सदर न्यायालयात वकिलाचे काम करणाऱ्या श्री राजनारायण दत्त आणि श्रीमती जान्हवी देवी यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. शेकपुरा नामक एका छोट्या गावातील मशिदीमध्ये मायकेल यांचे प्राथमिक शिक्षण झाले. येथे त्यांनी फारसी भाषा शिकण्यास सुरुवात केली. लहानपणापासून मायकेल यांना त्यांचे शिक्षक आणि सवंगडी एक हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी म्हणून ओळखू लागले.

कोलकातामध्ये शिक्षण घेत असताना मायकेलची ओळख इंग्रजी साहित्य आणि जीवनशैलीशी झाली. कोलकाताच्या हिंदू महाविद्यालयातील एक इंग्रज शिक्षक डेव्हिड लेस्टर रिचर्डसन यांचा मायकेलवर चांगलाच प्रभाव पडला. याच रिचर्डसन यांनी मायकेलला इंग्रजी काव्याची विशेषतः लॉर्ड बायरन या कवीच्या काव्याची गोडी लावली.

साधारण १७ वर्षांच्या वयात मायकेल कविता लिहू लागले. याच काळात त्यांच्यावर यंग इंडिया या चळवळीचा प्रभाव पडू लागला. हिंदू महाविद्यालययाच्या (हे सध्या प्रेसिडेन्सी महाविद्यालय म्हणून ओळखले जाते) काही माजी विद्यार्थ्यांनी अन्याय अत्याचार, अंधश्रद्धा आणि कालबाह्य रुढींच्या विरोधात ही चळवळ उभारली होती. मायकेलवर या चळवळीचा प्रभाव पडू लागल्याचे पाहताच त्याच्या वडिलांनी मायकेलचे लग्न लावून देण्याचा घाट घातला. मायकेलने याविरुद्ध बंड केले. याच काळात मायकेलचा ख्रिस्ती धर्माच्या दिशेने कल झुकू लागला होता.

लग्नाच्या कचाट्यातून सुटायचे म्हणून मायकेल दत्त यांनी ९ फेब्रुवारी १८४३ रोजी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर त्यांनी मायकेल हे नाव घेतले. मायकेलना हिंदू महाविद्यालय सोडावे लागले. त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथील बिशप महाविद्यालयातून १८४४ ते १८४७ च्या दरम्यान शिक्षण घेतले. बिशप महविद्यालयात मायकेलने ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले.

धर्मांतरामुळे मायकेलना घरातून आर्थिक मदत मिळणे बंद झाले. उपजीविकेसाठी त्यांनी मद्रास पुरुष अनाथालय (१८४८ ते १८५२) आणि मद्रास विश्वविद्यालय माध्यमिक प्रशाला (१८५२- १८५६) येथे अध्यापन चालू केले.

लग्न आणि कुटुंब[संपादन]

मायकेल मधुसूदन यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय वादळी होते. मद्रास येथे असताना त्यांनी रिबेका थॉम्पसन मॅकटॅव्हिश या इंग्रज स्त्रीशी विवाह केला. या विवाहातून ४ अपत्ये झाल्यावर त्यांनी या कुटुंबाचा त्याग केला आणि अमेलिया हेन्रीएट्टा सोफिया या फ्रेंच स्त्रीशी लग्न केले. या विवाहातून झालेल्या मोठ्या मुलीला त्यांनी शर्मिष्ठा असे भारतीय नाव दिले.

कोलकाता येथील जीवन[संपादन]

१८५८ ते १८६२ या काळात मायकेल मधुसूदन यांनी कोलकाता येथील न्यायालयात मुख्य दुभाषक म्हणून मुख्य कारकुनाचे पद स्वीकारले. बेथून आणि बायझाक या मित्रांच्या सल्ल्यावरून मायकेल मधुसूदन आपल्या मातृभाषेत साहित्य निर्मिती करू लागले.कोलकातामध्ये असताना मायकेल यांनी ५ नाटके लिहिली, चार काव्ये लिहिली आणि तीन नाटकांचे बंगालीतून इंग्रजीमध्ये अनुवाद केले.

वकिली[संपादन]

१८६२ ते १८६६ या काळात मायकेल मधुसूदन यांनी वकिलीचा अभ्यास केला. १८६२ मध्ये लंडन येथील ग्रेज इन महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण सुरू केले. १८६३ मध्ये त्यांचे कुटुंबीय लंडन येथे दाखल झाले. अर्थात आर्थिक चणचणीमुळे मायकेलना आपल्या कुटुंबीयांसहित व्हर्साय या तुलेनेने स्वस्त ठिकाणी स्थायिक व्हावे लागले. १८६५ मध्ये समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या आर्थिक मदतीमुळे मायकेलना पुन्हा इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण करता आले. या मदतीबद्दल मायकेल हे विद्यासागर यांचा अनेकदा दयासागर असा उल्लेख करत. फेब्रुवारी १८६७ मध्ये मायकेल कोलकाता न्यायालयात वकिली करू लागले.त्यांचे कुटुंबीय १८६९ मध्ये भारतात आले.

साहित्यिक योगदान[संपादन]

मद्रास येथे असताना मायकेल दत्त हे हिंदू क्राॅनिकल, मद्रास सर्क्युलेटर, युरेशियन अशा अनेक नियतकालिकांत लिहीत होते. मद्रास स्पेक्टेटर या नियतकालिकाचे ते साहाय्यक संपादक होते. मद्रासमधेच त्यांनी टिमोथी पेनपोएम या टोपण नावाने दोन पुस्तके लिहिली.[२][३]

बंगाली, तमिळ, तेलुगु , संस्कृत, ग्रीक , लॅटिन आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या मायकेल मधुसूदन दत्त यांनी प्रस्थापित बंगाली साहित्य शैलीला आव्हान दिले आणि लेखनात आधुनिक शैलीचा अविष्कार केला.

बंगाली भाषेत सुनीत ( इंग्रजी : Sonnet) तसेच अमित्राक्षर हे निर्यमक काव्य ( इंग्रजी :Blank Verse) हे प्रकार मायकेल मधुसूदन यांनी बंगाली भाषेत सर्वप्रथम आणले. 'मेघनाद वध' हे बंगाली भाषेतील पहिले महाकाव्य.

मद्रास येथे असताना टिमोथी पेनपोएम या टोपण नावाने मायकेल मधुसूदन यांनी दोन काव्ये लिहिली. यामध्ये पौरस राजाची कथा सांगणारे एक काव्य आणि पृथ्वीराज संयोगितेच्या कथेवर आधारलेले 'द कॅप्टिव्ह लेडी' हे काव्य लिहिले.

कोलकाता येथे असताना लिहिलेल्या मेघनादवध या महाकाव्यामुळे मायकेल मधुसूदन हे प्रसिद्धीच्या झोतात आले. ग्रीक महाकवी होमर आणि इटालियन महाकवी दांते यांच्या शैलीची आठवण करून देणाऱ्या, रावणाचा मुलगा मेघनाद याच्या वधाचे वर्णन असणाऱ्या या काव्याचे मूळ भारतीय मातीतले असल्यामुळे भारतीय वाचकांना माहिती असलेल्या विषयाचे नव्या शैलीतील सादरीकरण नावीन्यपूर्ण वाटले.

क्रमांक साहित्यकृती प्रकार वर्ष
द कॅप्टिव्ह लेडी १८४९
व्हिजन्स ऑफ द पास्ट १८४९
शर्मिष्ठा नाटक १८५९
पद्मावती नाटक १८५९
बुरो शालीकर घरे रो नाटक १८६०
एकेई की बाले सभ्यता नाटक १८६०
कृष्णाकुमारी नाटक १८६०
मेघनादवध महाकाव्य १८६१
तिलोत्तमा संभव काव्य काव्य १८६१
१० ब्रज गान काव्य काव्य १८६१
११ वीरांगना काव्य काव्य १८६१
१२ चतुर्दशपदी सुनीत संग्रह १८६६
१३ माया कन्नन नाटक १८७२

अखेरचे दिवस आणि मृत्यू[संपादन]

कोलकाता येथे आल्यावर मायकेल यांना दारू पिण्याचे व्यसन जडले. याच व्यसनाने त्यांचा २९ जून १८७३ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी तीनच दिवस आधी त्यांची पत्नी अमेलिया हेन्रीएट्टा यांचे निधन झाले होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/michael-madhusudan-dutt-life-facts-985440-2017-06-29
  2. ^ https://www.mapsofindia.com/who-is-who/literature/michael-madhusudan-dutt.html
  3. ^ Datta, Michael Madhusudan (2004-03-11). The Slaying of Meghanada: A Ramayana from Colonial Bengal (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780198037514.